Saturday, June 27, 2015

बाबासाहेबांचे कार्य ‘जाती’मुळे झाकोळले

             भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दलितांसाठीच लढा पुकारला नाही तर तो समस्त मानवजातीसाठी पुकारला. आंबेडकर हे विचारवंताचे विचारवंत होते मात्र येथील तथाकथित लोकांनी त्यांना जातीपलिकडे पाहिले नाही. त्यामुळेच त्यांचे राष्ट्रीय कार्य झाकोळले गेल्याची खंत खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी आज ‘संविधान गौरव दिनी’ व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब इन्स्टिट्यूट ऑफ सोशल ऍन्ड इकॉनॉमिक चेंज, या संस्थेच्यावतीने बाबासाहेबांच्या ‘ऍनिहिलेशन ऑफ कास्ट’ अर्थात ‘जातीप्रथेचे विध्वंसन’ या ऐतिहासिक ग्रंथाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त त्यांनी प्रेस क्लबमध्ये पत्रकारांना माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. आंबेडकरांनी राष्ट्रासाठी अनेक कार्य केले. देशात रूढ असलेल्या जातीप्रथेविरूद्ध महात्मा फुले यांच्यानंतर लढा देण्याचे काम खर्‍या अर्थाने बाबासाहेबांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हयातीतील ३७ वर्षे जातीव्यवस्थेचे निर्मूलन आणि उच्चाटन करण्यासाठी घालवले. देशात आंबेडकर अनुयायी महिनाभर भीमजयंती साजरी करतात. मात्र इतर लोक त्यापद्धतीने करत नाहीत. देशात सुरू असलेला जातीवाद बाबासाहेबांना कधीच मान्य नव्हता. एकदा बाबासाहेबांना जातपातक तोडक मंडळाने एका वार्षिक अधिवेशनात अध्यक्षपद देऊन भाषणासाठी बोलावले. मात्र बाबासाहेबांना जाती व्यवस्थेवर बोलण्यास मज्जाव केला. त्यावेळी बाबासाहेबांनी त्यांना स्पष्टपणे निक्षूण सांगितले की ‘मला अध्यक्ष करा असे मी तुम्हाला सांगितले नाही, त्यामुळे मी माझे भाषण बदलणार नाही. माझं अध्यक्ष भाषण झालं नाही तरी चालेल पण मी भाषणाचा एक स्वल्पविरामही बदलणार नाही. त्यानंतर ते भाषण प्रसिद्ध करण्यात आले. या भाषणावर महात्मा गांधी यांनी डॉ. आंबेडकर हे हिंदू धर्माला आव्हान आहे अशी टीका केली होती अशी आठवणही त्यांनी उपस्थितांना करून दिली. जातीव्यवस्था ही समाजाला लागलेली कीड आहे. त्यामुळे जाती निमुर्लन झाले तर देशाची प्रगती होईल. आज अनेक ठिकाणी समाजात समानता असल्याचे दाखवण्यात येते. त्यासाठी खान-पान, पार्ट्या , राहणीमान एकमेकांच्या धर्माविषयी आदर असल्याचे दाखविले जाते मात्र ज्यावेळी लग्नाचा विषय निघतो त्यावेळी त्याची सर्वात आधी ‘जात ’पाहिली जाते. देशातील जातीनिमूर्लन कायमचे नष्ट करायचे असेल तर त्यासाठी आज मोठ्या प्रमाणात आंतरजातीय विवाह होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. राज्यात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान गौरव दिन’ म्हणुन साजरा करण्यात येतो. मात्र या दिवशी चौथा शनिवार आल्याने प्रशासनाने एका परिपत्रकाद्वारे हा गौरव आदल्या दिवशी साजरा करण्याचे ठरवल्याने अनेक ठिकाणी गोंधळ पाहावयास मिळाला. ‘संविधान गौरव दिन’ आदल्या दिवशी साजरा करणे कितपत योग्य आहे असा प्रश्‍न मुणगेकर यांना विचारला असता ते म्हणाले की, मला याबाबत माहित नाही. पण ‘संविधान गौरव दिन’ साजरा करणारे देशातील महाराष्ट्र राज्य हे एकमेव आहे. गेल्यावर्षी हा दिवस २६ नोव्हेंबर रोजीच साजरा करण्यात आला होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली. अण्णा हजारे आणि शरद पवार प्रकरणावरही त्यांनी आपले मत मांडले. अण्णा हजारे यांनी चालवलेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनांचे आपण वैयक्तीकरित्या समर्थन करतो पण अण्णा हजारे यांनी चालवलेली माझेच ऐका ही आडमुठेपणाची भुमिका आपल्याला मान्य नाही. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर माथेफिरूने केलेला हल्ला हा दुर्दैवी असून त्याचा आपण निषेध करत असल्याचे सांगितले. राज्यात येऊ पाहणारे खाजगी विद्यापीठ हे गरीब विद्यार्थ्यासाठी नुकसानकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment