Friday, June 19, 2015

बाबासाहेब आणि वैवाहिक जीवन

      

     डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैवाहिक जीवनाची सुरुवातीची वर्षे अत्यंत हलाखिमध्ये व गरिबीत गेली. त्यांच्या पत्‍नी रमाबाई मोठ्या उदार मनाच्या व पतीला सदोदित साथ देणार्‍या होत्या. दलित-बहुजन समाजाला न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी सुरू केलेल्या अथक संघर्षामुळे बाबासाहेब स्वता:च्या प्रपंचाकडे फारसे लक्ष देऊ शकले नाहीत. पण, आपल्या पत्‍नीवर त्यांचे अपार प्रेम होते. बाबासाहेबांच्या पत्नी रमाबाई व त्यांचे ३५ वर्षांचे सहजीवन, रमाबाईंनी आपल्याला सांभाळले, कुटुंबवत्सल असलेले बाबासाहेब समाजाच्या हितासाठी किती तळमळत होते आणि त्यामुळे त्यांची कुचंबणा कशी होत होती, याची सारखी जाणीव त्यांना राहत होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या कुटुंबीयांसह "राजगृह' या आपल्या सुंदर व प्रशस्त वास्तूत राहण्यास आले होते. डॉ. आंबेडकरांनी तीन-तीन खोल्यांचे दोन ब्लॉक्स राजगृहाच्या तळमजल्यावर बांधून घेतले होते. त्या दोन ब्लॉक्समध्ये त्यांनी आपल्या कुटुंबीयांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. राजगृहाच्या पहिल्या मजल्यावर डॉ.बाबासाहेबांनी स्वत:च्या राहण्याच्या सोयीबरोबरच आपल्या प्रिय ग्रंथालयाची आणि कार्यालयाचीही सोय केली होती. त्यांनी स्वत: आराखडा तयार करून त्याप्रमाणे सोयी करून घेतल्या होत्या.
आर्थिक स्थिती थोडी बरी झाल्यामुळे १९३० मध्ये त्यांनी दादरच्या हिंदू कॉलनीत ९९ आणि १२९ क्रमांकांचे प्लॉट विकत घेऊन ठेवले होते. त्यांनी पाचव्या गल्लीतील १२९ क्रमांकाच्या प्लॉटवर आपल्या कुटुंबीयांबरोबर राहण्यासाठी इमारत बांधण्याचे ठरविले होते. आणि तिसर्‍या गल्लीतील ९९ क्रमांकाच्या प्लॉटवर भाड्याने देण्यासाठी इमारत बांधण्याचे ठरविले होते. त्यासाठी त्यांनी सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतले होते. त्यांनी १९३१ च्या जानेवारी महिन्यात १२९ क्रमांकाच्या प्लॉटवर राहण्याच्या वास्तूचे बांधकाम सुरू केले. ते बांधकाम १९३३ मध्ये पूर्ण होऊन "राजगृह' ही राहण्याची वास्तू तयार झाली. प्लॉट क्रमांक ९९ वर दुसर्‍या इमारतीचे बांधकाम १९३२ मध्ये सुरू झाले. ते बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यांनी त्या इमारतीचे नाव "चार मिनार' असे ठेवले. "राजगृह' हे नाव हिंदू संस्कृती आणि बौद्ध संस्कृतीशी संबंधित होते, तर "चार मिनार'हे नाव मुस्लिम संस्कृतीशी संबंधित होते. पुढे ग्रंथांच्या खरेदीच्या आणि इतर गोष्टींच्या कर्जाची फेड करण्यासाठी ९ मे १९४१ रोजी त्यांनी "चार मिनार' ही इमारत विकली. मात्र "राजगृह' ही वास्तू त्यांनी कायम आपल्या मालकीची ठेवली.
"राजगृह' या आपल्या मालकीच्या प्रशस्त वास्तूत राहण्यास आल्याचा रमाबाईंना व सर्वांनाच अतिशय आनंद झाला. ते सर्व जण पोयबावाडीच्या चाळीतील भाड्याच्या खोल्यांतून आपल्या स्वत:च्या राजगृहात राहण्यास आले होते, याचा त्यांना अत्यानंद होणे स्वाभाविक आहे! त्या अत्यानंदातही रमाबाई पोयबावाडीच्या चाळीतील स्त्रियांना कधी विसरल्या नाहीत. रमाबाई आपुलकीने त्या स्त्रियांना भेटण्यास जात असत आणि त्यांना आपल्या घरी येण्याचे आमंत्रण देत असत. रमाबाई म्हणजे मूर्तिमंत माणुसकीच होत्या. प्रेमळ व कष्टाळू रमाबाई आपुलकीने माणसे जोडण्यात आणि समाजसेवेला पूर्णपणे वाहून घेतलेल्या आपल्या प्रिय पतीच्या पाठीशी मोठ्या विश्वासाने खंबीरपणे उभे राहण्यात पारंगत होत्या. हा त्यांचा सद्गुणच त्यांच्या संसाराचा भक्कम आधार होता!
डॉ. आंबेडकर आपल्या संसाराची, पत्नी रमाबाई, भावजय लक्ष्मीबाई, मुलगा यशवंत आणि पुतण्या मुकुंद यांची काळजी घेत असत. रमाबाई व यशवंत यांच्या आजारपणाकडे आणि औषधोपचारांकडेही त्यांचे लक्ष असे; परंतु समाजसेवेच्या कार्यातून त्यांना घरच्यांसाठी जास्त वेळ देता येत नव्हता, ही त्यांची व्यथा होती. ते घरच्यांना खर्चासाठी पुरेसा पैसाही देऊ शकत नव्हते. ते विचार करीत होते, की मुंबईतील सरकारी लॉ कॉलेजचे प्राचार्यपद जर आपल्याला मिळाले, तर आपली आर्थिक स्थिती थोडी सुधारेल. ते त्यासाठी १९३२ पासूनच प्रयत्न करीत होते. पण मे १९३५ पर्यंत त्यांना त्या प्रयत्नांत यश मिळाले नाही. तरी पण त्यांचा प्रयत्न चालूच होता. अशा वेळी काळाने त्यांच्या संसारावर अतिशय दु:खद आघात केला.
१९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाबाईंचा आजार वाढतच चालला होता. औषधोपचारही लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाबाईंच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाबाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वत: बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वत:च्या हाताने पाजण्याचा प्रयत्न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाबाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत. त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही. २६ मे १९३५ रोजी सकाळच्या नऊ वाजण्याच्या वेळेस रमाबाईंचे दु:खद निधन झाले आणि बाबासाहेबांवर दु:खाचा फार मोठा आघात झाला! जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणार्‍या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले! एक चिंताजनक प्रश्न निर्माण झाला होता, की डॉ. आंबेडकर आता आपले समाजसेवेचे व्रत चालू ठेवतात की सोडून देतात! पण त्या महामानवाने आपली प्रिय पत्नी रमाबाई यांच्या अंतरीच्या इच्छेचा मान राखला आणि अस्पृश्यांच्या व हिंदुस्थान या आपल्या देशाच्या भल्यासाठी आपले समाजसेवेचे व्रत चालूच ठेवले. आपले कोणतेही कर्तव्य असो, ते निष्ठेने करीत राहण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कर्तव्यपूर्तीचा आनंद अनुभवीत असत.
बाबासाहेबांच्या पत्नी माईसाहेब आंबेडकर.....!!!
त्यानंतर बाबासाहेबांनी १५ ऎप्रील १९४८ रोजी डॉ. सविता (शारदा) कबीर सोबत दुसरा विवाह केला, एवढेच लोकांना माहिती आहे. पण, हा विवाह कोणत्या परिस्थितीमध्ये केला याची माहिती मात्र लोकांना नाही. बाबासाहेबांचे आयुष्याच्या शेवटपर्यंत खाजगी सचिव असलेल्या नानक चंद रत्तू यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लिहिलेल्या आठवणींच्या पुस्तकात या बाबतीत लिहिलेले आहे.
बाबासाहेब मुंबईला डॉ. माधव मावळंकर यांच्या दवाखान्यात १९४८ मध्ये दाखल झाले होते. तेव्हा त्यांनी मधुमेहाच्या आजारावर रोज इन्सुलिनचे इंजेक्शन घेणे गरजेचे आहे असे बाबासाहेबांना सांगितले होते. तेव्हा तुमची शुश्रूषा करेल अश्या स्त्री सोबत तुम्ही एकतर लग्न करा किवा तुमच्या सोबत एखादी स्त्री परिचारिका म्हणून ठेवा अशी सुचना डॉक्टरांनी केली. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की, “ माझ्या समाजातील सार्‍याच स्त्रिया मला बाबा म्हणतात. मी कुणाशी लग्न करु?”
अशावेळी डॉ. सविता कबीर बाबासाहेबांना भेटल्या. त्यांनी परिचारिका म्हणून बाबासाहेबांसोबत दिल्लीला येण्याची आणि तेथे त्यांची शुश्रूषा करीत महिनाभर राहण्याची तयारी दर्शवली.
बाबासाहेबांनी त्यांची सुचना मान्य न करता त्यांना लिहिलेल्या पत्रात बाबासाहेबांनी लिहिले की, “एखादी स्त्री माझी शुश्रूषा करण्यासाठी माझ्या जवळ असावी, याबद्दल तुम्ही जे विचार मांडले आहेत, ते मला मुळीच स्वागतार्ह वाटलेले नाहीत. या बद्दल मला माफ करा. मी कमालीच्या नैतिक आणि धार्मिक वातावरणात लहानाचा मोठा झालो आहे. त्यामुळे अवांछनिय संबंधांची जाहीर चर्चा निर्मान होईल, असा प्रस्ताव तर सोडाच, पण साधा विचारही मी करू शकत नाही. सार्वजनिक जीवनातील माझी प्रतिमा स्वच्छ चारित्र्याचा आणि निष्कलंक नीतिमत्तेचा व्यक्ती या लौकिकावर उभी राहिलेली आहे. माझे शत्रू सुध्दा मला घाबरत असतील आणि माझा आदरभाव करत असतील, तर ते याच कारणाने! त्या लौकिकाला तडा जाण्याची जराही शक्यता ज्यात असेल, असे काहीही माझ्या हातून कदापिही घडणार नाही. माझी पत्‍नी गेली, तेव्हा मी अविवाहित राहण्याची प्रतिज्ञा केली होती. ती मोडावी लागली तर, मी विवाह करीन, पण कोणत्याही परिस्थितीत आणि विशेषत: घरात दुसरी कोणी स्त्री नाही, अशा वेळी परिचारिका किंवा साथीदार ठेवण्याची सूचना मी मुळीच मान्य करणार नाही.”
डॉ. कबीर आणि बाबासाहेब यांच्यात जवळपास चार महिने पत्रव्यवहार झाला. आपल्या पत्‍नी बद्दलच्या अपेक्षा व्यक्त करतानाच, त्यांनी स्त्रियांबद्दलचा आपला प्रचंड आदरभाव या पत्रात व्यक्त केला आहे. या बाबतीत त्यांनी दादासाहेब गायकवाड व त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करुन त्यांचे मत विचारात घेतले.
डॉ. कबीर आणि बाबासाहेब यांचा विवाह झाला. डॉ. सविता कबीर या माईसाहेब आंबेडकर म्हणून, बाबासाहेबांच्या जीवनात आल्या. निकोप चारित्र्याला जपणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे हे विलक्षण हिमालयाच्या उत्तुंग उंचीचे व्यक्तिमत्व होते...!

No comments:

Post a Comment