Thursday, June 18, 2015

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ध्येय आणि मार्ग

 शिका , संघटीत व्हा आणि संघर्ष करा ”
असे आपल्या समाज बांधवाना सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे सवर्णांच्या जुलमान्विरुध उगारलेली वज्राची मुठ होय. आंबेडकर म्हणजे जातीभेदावर , विषमतेवर , धर्ममार्तंडांच्या वर्चस्वावर , समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांवर सदैव पुकारलेले युद्धच होय.
    डॉ. बाबासाहेब आंबेडकर अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान होते. सामाजिक , राजकीय ,आर्थिक, शैक्षणिक , धार्मिक , पत्रकारिता , कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिन-दलितांच्या , श्रमिकांच्या , विस्थापितांच्या , शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रद्य्नेचा संदेश दिला . गलितगात्र झालेल्या मनामनातुन समाजक्रांतीचे स्फुलिंग चेतवून  डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले . समतेवर आधारित समाजरचना घडावी असे त्यांचे ध्येय होते .


शैक्षणिक ध्येय :


    शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे . शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश समाजाला सत्वाची जाणीव व्हावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले . “ शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे , ते जो पिला तो माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही .” असे ते समाज बांधवाना सांगत . प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे , म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे ते सांगत . प्रथमिन शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे कि मुलगी किंवा मुलगा एकदा शाळेत दाखल झाले कि ते परिपूर्ण सुशिक्षित , माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावेत . शासनाने यासाठी लक्ष दयायला हवे . डॉ. बाबासाहेबांचे म्हणने होते कि , समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे . शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौधीकदृष्ट्या सशक्त होतो . व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो . प्रज्ञा , शील आणि करुणा  हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज आहे . शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये , तर मुलांची मने सुसंकृत व गुणवत्तामय बनवावी . समाज हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत, असे शिक्षण असावे . शला म्हणजे उत्तम नागरिक बनविणारे आहेत याचे भान या प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांनी ध्यानी घ्यावे . १९४६ साली पिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून त्यांनी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज आणि औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरु केले . राष्ट्रहिताचे व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय , असे ते मानीत .

सामाजिक ध्येय :



    डॉ. बाबासाहेब आंबेडकर  सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते . भ्रष्टाचार , अनीती ,अत्याचार , अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता . जातिभेदाच्या ते विरोधात होते . जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे , असे ते मानत . हि सामाजिक कीड नष्ट केल्याशिवाय अमज एकसंघ होणार नाही ., असे ते समजत . इ . स . १९२७ च्या सुमारास त्यांनी अस्पृशतेविरुद्ध जागृत चळवळ सुरु करण्याचा निर्णय घेतला . त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेश्यासाठी सार्वजनिक चळवळ व मोर्चे काढण्यास सुरवात केली . दलितांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी ते दिवस-रात्र झटत राहिले . सवर्णांच्या मनात कधीतरी अस्पृशांबद्दल सदभावना जागृत होईल या आशेवर ते प्रयत्नशील होते . हिंदू धर्मात आपल्याला आदराची वागणूक मिळावी यासाठी त्यांनी मोठा लढा दिला . पाच वर्षापासून नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या जिकरीने लढा चालवीत होते . पण पाषानहृदयी हिंदुना अस्पृश्य कधीच मानवाच्या बरोबरीचे वाटले नाही . त्यांना दलित व अस्पृश्य जनता हि नेहमीच कुत्र्या-मांजरापेक्षाही खालच्या दर्जाची वाटे . नाशिकच्या लढ्यात सनातनवाद्यांनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेशापासून रोखण्यासाठी मोठी ताकद लावून लढा दिला . शेवटी सनातन्यांच्या अवमानी वृत्तीला कंटाळून बाबासाहेबांनी एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे धर्मांतराचा .
    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांची समाजात असलेली गुलामगिरी दूर केली . १९४२ साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले कि स्वच्छता पाळा , सर्व दुर्गुणांपासून दूर राहा , मुलामुलींना शिक्षण द्या ,त्यांना महत्त्वाकांक्षी बनवा , त्यांचा न्यूनगंड दूर करा , अंधश्रद्धा नष्ट करा असा महत्वाचा उपदेश दिला .

राजकीय ध्येय :


इ . स . १९२० च्या दशकात आंबेडकर दलितांचे एक नामवंत राजकीय नेते बनले . जातीसंस्थेविरुद्ध काहीही न करणाऱ्या पक्षांना त्यांनी आपल्या टिकेचे लक्ष बनवले . दलितांसाठी त्यांनी नविन राजकीय आघाडी काढली . ८ ऑगस्ट १९३० साली मागास्वर्गीयांच्या सभेमध्ये आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टीकोन लोकांसमोर जाहीर केला . मागास्वर्गीयांनी काँग्रेस आणि ब्रिटीश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत , असे त्यांनी सांगितले . त्यांनी मागास्वर्गीयांसाठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली .
पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या . १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक ,राजकीय , कायदेशीर दर्जा वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला . यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल तयार लार्ण्याचे महान कार्य हाती घेतले . पण काँग्रेस मधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ती आंबेडकरांचा विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या आणि त्यांना आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागले . आंबेडकरांचे हिंदुकोड बिल जर मान्य झाले असते तर हिंदू समाजातील सर्व भेद , अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती . पण दुर्दैव भारताचे ! दुर्भाग्य हिंदू समाजाचे ! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्व:ताचा घात करून घेतला .
“ स्पृश्य हिंदूंच्या बहुमताच्या आधारावर माझे व माझ्या पक्षाचे राजकीय जीवन गांधीजी आणि काँग्रेस ह्यांनी या देशातून नष्ट करून टाकले ! ” नऊ कोटी मुसलमानांना खुश करण्यासाठी काँग्रेसने ह्या सुवर्ण भूमीचे तुकडे करून टाकले. पण सहा कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळविण्यासाठी कागदी कायदे करण्यापलीकडे काहीही केले नाही . असे असताना सुद्धा देशाला स्वतंत्र मिळताच घटना समितीत अखंड हिंदुस्थानाची आणि जातिय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरांनी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले . आंबेडकर म्हणाले जगातील कोणतीही सत्ता या देह्सातील ऐक्याचा भंग करू शकणार नाही आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे हे आज न उद्या मुसलमानांना कळल्यावाचून राहणार नाही . आंबेडकरांचे हे उद्गार हा त्यांचा दैदिप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय .
काँग्रेसशी असलेले पूर्वीचे सर्व वैर विसरून आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरूंच्या हातात हात दिला आणि स्वतंत्र भारताची घटना तयार करण्याची सर्व जबाबदारी त्यांनी पत्करली . “ मनुस्मृती जाळा म्हणून सांगणारे आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार व्हावेत हा काय योगायोग आहे! ”    बाबासाहेबांच्या भाषणाच्यावेळी बाबासाहेबांच्या मुखातून जणूकाही भविष्याचे संविधानच बाहेर पडत होते . संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाची आचारसंहिताच लिहिली जात होती . बाबासाहेबांचे भाषण झाल्यावर सभागृह टाळ्यांच्या कडकाडाटीने निनादून उठले . संपूर्ण सभागृहातील सदस्यांनी बाबासाहेबांच्या विद्वतेपुढे मानच झुकविली  होती . डॉ . बाबासाहेब आंबेडकरांना स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा शिल्पकार ठरविण्याचा बहुमान आम जनतेने बहाल केला आहे . डॉ. आंबेडकरांनी हि जबाबदारी , हे कार्य अत्यंत योग्यपणे पार पाडले यात मला तिळमात्रही शंका नाही , म्हणून आम्ही त्यांचे ऋणी आहोत .

धार्मिक ध्येय :


    आंबेडकरांची धर्मावर आत्यंतिक निष्ठा होती . आंबेडकर कितीही तर्ककर्कश आणि बुद्धिवादी असले तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठांचा होता . भाविक आणि श्रद्धाळू पित्याच्या पोटी जन्म झाला होता . शुचिर्भुत वातावरणात त्यांचे सारे बालपण गेले होते. आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता असते असे त्यांचे ठाम मत होते . डॉ . बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराची संकल्पना स्पष्ट होती ती अशी कि हिंदू धर्मात अस्पृश्यांना सहानुभुतीची वागणूक मिळत नाही. जो धर्म जातिव्यवस्थेचा पुरस्कार करून माणसा-माणसांत भेद करतो . ज्या धर्मात स्वतंत्र्य , समता , बंधुता नाही त्या धर्मात राहून अस्पृश्यांचा उद्धार होणार नाही , म्हणून त्यांनी धर्मांतर केले पाहिजे . बाबासाहेबांनी धर्मांतराच्या घोषणेनंतर सलग एकवीस वर्षे विविध धर्माचा सखोल अभ्यास केला . या काळात त्यांचा कौल बौद्ध धम्माकडे वळला . बुद्धाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृशच नव्हे तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही असा त्यांचा ठाम निश्चय झाला होता . बाबासाहेबांना बुद्धाचा जीवनमार्ग लोककल्याण , सदाचार , समता , स्वातंत्र्य व बंधुतेचा वाटला म्हणून त्यांनी १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथे आपल्या अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला आणि “साऱ्या भारताला मी बौद्धमय करीन ” अशी गगनभेदी भीमगर्जना केली . त्यांचे हे ध्येय आपल्या सर्वांना पूर्ण करायचे आहे .
डॉ . आंबेडकर म्हणजे नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घालून आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली . त्यांनी मनुष्यमात्रांच्या जीवनातील दुःख , दारिद्र्य आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले संपूर्ण ज्ञान , माहिती व बळ लावले आणि रंजल्या-गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या , शेतकरी , मजूर वर्गाच्या आणि पददलीतांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून मंगलवाट दाखविते आणि मानवतेची दिव्यज्योत निर्माण करते ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर ती व्यक्ती प्रेरक उद्धारक आणि तारकशक्ती  ठरते .
अशा या महामानवाचे कार्य म्हणजे देशासाठी व समाजासाठी सामाजिक बांधिलकीचे कर्तव्य होय . डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विश्वाला मिळालेली महान देणगी होय .

No comments:

Post a Comment